महावितरणची थकबाकीदारांसाठी सुवर्णसंधी, व्याज आणि विलंब आकार माफ
पुणे: राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणने वीजबिल थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी ‘अभय’ योजना २०२४ लागू केली आहे. या योजनेअंतर्गत, वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपात १७८८ कोटी रुपयांची माफी मिळणार आहे.
महावितरणने १ सप्टेंबरपासून ही योजना सुरू केली असून, ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही मालक, खरेदीदार किंवा ताबेदाराने वीजबिल भरणे आवश्यक आहे. म्हणूनच थकीत बिल भरण्यासाठी ही सवलतीची योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ असून, ३१ मार्च २०२४ पर्यंत वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी लागू आहे. कृषी ग्राहकांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही. ग्राहकांना मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरावी लागणार असून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यांत भरता येईल. घरगुती व लघुदाब ग्राहकांना एकरकमी बिल भरल्यास १० टक्के सवलत मिळेल, तर उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना ५ टक्के सवलत मिळेल.
वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाइट किंवा महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल.