पुणे – गुन्हेगारांच्या बेकायदा घरांवर बुलडोझरची तयारी; पोलिस आयुक्त अमितेश कुमार
पुणे: गुन्हेगारांनी बेकायदा पद्धतीने उभारलेल्या घरांवर आता कारवाई होण्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी अशा घरांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून, लवकरच यावर बुलडोझर फिरवला जाईल.
महापालिकेच्या सहकार्याने या कारवाईला सुरूवात होणार असल्याची घोषणा पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आंदेकर हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड लक्षात घेता, या गुन्हेगारांची घरे बेकायदा असल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असे आयुक्त कुमार यांनी सूचित केले.
आतापर्यंत आंदेकर हत्या प्रकरणात १५ जणांना अटक करण्यात आली असून, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी काही आरोपी पोलिसांच्या तपासात असून, त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.