पुणे: पुणे महापालिकेत युवकांसाठी कामाची सुवर्णसंधी – ‘लाडका भाऊ योजना’ अंतर्गत विद्या वेतन
पुणे – राज्यातील बारावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ (लाडका भाऊ योजना) राबविण्यात येत आहे. या योजनेत शहरातील युवकांना पुणे महापालिकेत विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत सर्वाधिक जागा अभियांत्रिकी आणि आयटीआय संवर्गातील आहेत. बारावी उत्तीर्ण युवकांना ६ हजार रुपये, आयटीआय किंवा पदविका झालेल्यांना ८ हजार रुपये, तर पदवीधर किंवा पदव्यूत्तर शिक्षण घेतलेल्या युवकांना १० हजार रुपयांचे विद्या वेतन दिले जाणार आहे.
युवकांना कुठे मिळणार कामाची संधी?
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये युवकांना मॅकेनिक, सुतार, पेंटर, शीट मेटल वर्क, मशीन टूल दुरुस्ती, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), ट्रॅफिक वॉर्डन, माळी, हॉर्टिकल्चर मिस्त्री, अनुरेखक, आरेखक, लेखनिक, प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पर्यावरण विभाग आदींमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.