Pune Traffic Diversions: पुण्यात मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तीन हजार पोलिस तैनात, वाहतुकीतही करण्यात आले ‘हे’ बदल

पुणे: पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी भारतीय खाद्य निगम (एफ.सी.आय. गोडाऊन), कोरेगाव पार्क येथे होणार आहे. या मतमोजणीच्या दिवशी शासकीय अधिकारी, कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी आणि अन्य नागरिकांच्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नियोजनात बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक व्यवस्थेत बदल
नो-पार्किंग झोन:
मतमोजणी केंद्रासमोरील साऊथ मेन रोडच्या पूर्वेस लेन नंबर ५ जंक्शनपासून पश्चिमेस लेन नंबर २ जंक्शनपर्यंत आणि लेन नंबर ३ व ४ वर २०० मीटर परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो-पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे.
वाहतूक बंद:
डॉन बॉस्को युवा केंद्राजवळील साऊथ मेन रोड २२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील.
सेंट मीरा कॉलेज व अतुरपार्क सोसायटीकडून साऊथ मेन रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना लेन नंबर १ मध्ये प्रवेश बंद असेल.
पर्यायी मार्ग:
लेन नंबर ५, ६, व ७ कडून येणाऱ्या वाहनांना लेन नंबर ४ पुढे प्रवेश बंद राहणार असून वाहनचालकांना उजव्या बाजूने वळण घेऊन पुढील प्रवास करण्याची सूचना आहे. लेन नंबर २ (प्लॉट नंबर ३८, जैन प्रॉपर्टी) आणि लेन नंबर ३ (बंगला नंबर ६७ व ६८) येथून साऊथ मेन रोडला येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येईल.
पार्किंग व्यवस्था
प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी:
कस्तुरबा गांधी शाळा, नॉर्थ मेन रस्ता येथे ६००-७०० दुचाकींसाठी पार्किंगची व्यवस्था.
सामान्य नागरिक:
रोही व्हिला लॉन्स, लेन नंबर ७ येथे दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग.
चारचाकी वाहने:
द पुना स्कूल अँड होम फॉर द ब्लाईंड ट्रस्ट, नॉर्थ मेन रस्ता येथे प्रशासकीय अधिकारी व नागरिकांसाठी चारचाकी वाहन पार्किंग.
विशेष सूचना
अत्यावश्यक सेवेसाठी असणाऱ्या पोलीस, अग्निशमन दल, ॲम्ब्युलन्स आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या वाहनांना वगळता वरील प्रवेशबंदी लागू आहे. नागरिकांनी वाहतूक बदलाची नोंद घेऊन नियोजन करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.