ससून रुग्णालयातून मोक्का आरोपी निखील कांबळे पसार; येरवडा पोलिस स्टेशनचे तीन पोलिस निलंबित
पुणे, २३ ऑक्टोबर : येरवडा पोलिस ठाण्याच्या मोक्का गुन्ह्यातील आरोपी निखील कांबळे (वय २८) हा २१ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फायदा घेत पसार झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त हिंम्मत जाधव यांनी पोलिस कर्मचारी सुशांत भोसले, विठ्ठल घुले आणि सुरज ओंबासे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
निखील कांबळे यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०९ (४) ३ (५) आणि महाराष्ट्र संगठित अपराध नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. येरवडा परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकास मारहाण करून त्याला लुटल्याचा गुन्हा त्याच्यावर होता.
ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुन्हा पोलिस ठाण्यात आणणे अपेक्षित होते. मात्र, गुंजन चौकात गाडी थांबल्यानंतर कांबळेने अस्वस्थ असल्याचे सांगत पिण्यासाठी पाणी मागितले. या वेळी पोलिस कर्मचारी पाणी आणण्यासाठी गेले असता, त्याने गाडीतील पोलिस चालकाकडून हातकडी काढून घेतली आणि गाडीचा दरवाजा उघडून पसार झाला. पोलिसांनी पाठलाग केला, परंतु कांबळे निसटण्यात यशस्वी ठरला.
या घटनेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबन काळात कर्मचाऱ्यांना अर्धा पगार दिला जाणार असून त्यांना कोणतेही खासगी काम करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी कांबळेचा शोध लावून त्याला पुन्हा अटक केली असली तरी, या घटनेमुळे पोलिसांच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.