‘लाडक्या बहिणीं’ना २१०० रुपये कधीपासून? फडणवीसांचा महत्त्वाचा खुलासा
मुंबई : राज्यात महायुतीने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवत २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून १३२ जागा पटकावल्या आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठे यश मिळाले आहे. महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
महिला वर्गासाठी आकर्षक योजना म्हणून लाडकी बहीण योजनेने महायुतीला मोठे यश मिळवून दिले. निवडणुकीआधी या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याच मुद्द्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टता केली.
योजना सुरूच राहणार, आश्वासन पूर्ण करणार
“लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ती सुरूच राहील आणि त्यात वाढ करून महिलांना दरमहा २१०० रुपये देण्यात येतील. मात्र, हा निर्णय बजेटच्या वेळी घेतला जाईल. राज्यातील आर्थिक स्रोतांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतले जातील,” असे फडणवीस यांनी सांगितले.
आर्थिक तरतुदींची हमी
फडणवीस म्हणाले, “महायुतीने निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील. यासाठी आवश्यक त्या आर्थिक तरतुदी केल्या जातील. जी महिलांची पात्रता ठरवणाऱ्या निकषांमध्ये बसतील, त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल. कोणत्याही पात्र महिलेला योजनेंबाहेर ठेवले जाणार नाही.”
पुन्हा विचाराची गरज नाही
योजना रद्द होणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “लाडकी बहीण योजनेवर पुनर्विचार करण्याची गरज नाही. योजना सुरूच राहील आणि ती अधिक स्थिर व प्रभावी करण्यासाठी आवश्यक सुधारणा केल्या जातील.”
राजकीय वर्तुळात महायुतीच्या यशामागील लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आणि त्यावरून होणारी चर्चा जोरात असून, फडणवीसांच्या या घोषणेमुळे महिला वर्गात समाधानाचे वातावरण आहे.