पुणे: निलंबित पोलिस हवालदाराकडून महिला पार्लर व्यावसायिकाची अडीच लाख व सोन्याची फसवणूक; आरोपीवर आणखी अनेक गुन्हे उघड

0
4f0c670d-d4dc-4ee7-8fa8-baff343b6561_1760350575227.webp

पुणे : शहरात पुन्हा एकदा पोलिस दलातीलच एका निलंबित हवालदाराच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. गणेश अशोक जगताप (वय ५२, रा. कावेरीनगर, वाकड, पुणे) या निलंबित पोलिस हवालदाराने महिला पार्लर व्यावसायिकाची अडीच लाखांहून अधिक रक्कम आणि सहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला सुखसागरनगर, कात्रज येथील असून त्या पार्लर व्यवसाय चालवतात. गणेश जगताप यांचा त्या महिलेशी जुना कौटुंबिक परिचय होता. डिसेंबर २०१९ मध्ये पत्नीला कॅन्सर आणि कुटुंबाला कोरोनाचा त्रास असल्याचे सांगत जगताप यांनी महिले कडून एक लाख रुपये उधार घेतले. पुढील वर्षी, म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये आर्थिक अडचणीचे कारण देत त्यांनी लग्नातील सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यासाठी घेतले. त्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांनी फोनपेद्वारे आणखी १.५७ लाख रुपये घेतले.

वारंवार मागणी करूनही जगताप यांनी पैसे किंवा दागिने परत केले नाहीत. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलेनं अखेर पोलिस आयुक्तालयात तक्रार दाखल केली. तपासानंतर प्रकरण भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून, जगताप यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गणेश जगताप यांच्यावर यापूर्वीही फसवणुकीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. जुलै महिन्यात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात एका महिलेचे तब्बल ७३ तोळे सोने आणि १७ लाख रुपये रोख घेऊन फसवणुकीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला होता. २१ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांची बदली पोलिस मुख्यालयातून विशेष शाखेत झाली होती, परंतु ते हजर झाले नाहीत. त्या काळात औंध येथील एका सराफाकडून माजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे नाव वापरून ८ लाख २२ हजार रुपयांचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा प्रकारही समोर आला होता.

या घटनेनंतर तत्कालीन पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) मिलिंद मोहिते यांनी जगतापला निलंबित केले होते. याशिवाय, २०२१ मध्ये राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र सादर करून सरकारची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून वानवडी पोलिस ठाण्यातही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

वारंवार गुन्ह्यांमध्ये नाव येऊनही संबंधित निलंबित हवालदारावर कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Spread the love

Leave a Reply