पुणे: “जुलूस” मिरवणुकीत शॉक लागून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू – वडगावशेरीत हळहळ व्यक्त!
पुणे – वडगावशेरी येथे आयोजित “जुलूस” मिरवणुकीदरम्यान विद्युत शॉक लागल्यामुळे दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अभय अमोल वाघमारे (वय 17) आणि जकरिया बिलाल शेख (वय 19, दोघेही रा. वाडेश्वर नगर, वडगाव शेरी) अशी मृतांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या माहितीनुसार, रविवारी मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या वतीने जुलूस मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत मिम बॉईज ग्रुपने ट्रॅक्टरवर स्पीकर लावून मिरवणूक काढली होती. काही तरुण या स्पीकरच्या भिंतींवर उभे राहून झेंडे घेऊन नाचत होते.
भाजी मंडई चौकातून मिरवणूक वळत असताना अभय वाघमारे याच्या हातातील स्टील पाईपमध्ये असलेला झेंडा हाय टेन्शन वायरला लागला, ज्यामुळे त्याला जोरदार शॉक बसला आणि तो घटनास्थळीच मृत्युमुखी पडला. त्याच्याजवळ उभा असलेला जकरिया शेख यालाही शॉक लागल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याचा देखील मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या अपघाताची चौकशी सुरु असून, नेमकी जबाबदारी कोणाची आहे, याची तपासणी करण्यात येत आहे. सण-उत्सवांमध्ये डीजे साऊंड सिस्टीमचा वापर आणि सुरक्षा उपायांचा अभाव हे याप्रकरणी महत्त्वाचे मुद्दे ठरत आहेत. अशा घटनांमध्ये जबाबदार असलेले आयोजक देखील आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नसल्याचे निदर्शनास येते. यापूर्वी सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी डीजे साऊंड सिस्टीमच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेमुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, आणि यापुढे अशा घटना टाळण्यासाठी मंडळे, लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी आणि पोलीस प्रशासन योग्य पावले उचलणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे वडगावशेरीतील सर्व जुलूस कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, चंदन नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.