पुणे: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका…; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका
पुणे : राज्यात गुटखा आणि पान मसाल्याच्या अवैध वाहतूक-विक्रीवर आता अधिक कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे. गुटखा बंदीचा भंग करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करता येईल का, याबाबतचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवून मार्गदर्शन मागितले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिली.
आमदार श्रीकांत भारतीय यांनी गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सदस्य प्रवीण दरेकर यांनीही उपप्रश्न विचारले.
मंत्री झिरवाळ म्हणाले, “सध्याचा गुटखाबंदीचा कायदा दरवर्षी नूतनीकरण करावा लागतो. २०१२ पासून सुरू असलेली ही पद्धत बदलण्याची वेळ आता आली आहे.” त्यांनी राज्यभर झालेल्या कारवाईचा आढावा देताना सांगितले की, आतापर्यंत ४५० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १० हजारांहून अधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत.
विभागातील मनुष्यबळाच्या कमतरतेकडे लक्ष वेधत झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, नव्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले असून लवकरच ही अडचण दूर होईल. “नवीन कर्मचारी रुजू झाल्यानंतर गुटखाबंदीची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर अधिक प्रभावीपणे करू शकू,” असे ते म्हणाले.
राज्यातील विशेषतः सीमावर्ती भागात कर्करोगजन्य पदार्थांच्या सेवनात वाढ होत असल्याबाबत प्रश्नोत्तरात चिंता व्यक्त करण्यात आली. यावर उत्तर देताना झिरवाळ यांनी दहिसर, मुलुंड, मालाडसह संवेदनशील भागांमध्ये विशेष चौकशी अधिकारी नेमून तपासणी तीव्र केली जाईल, असे सांगितले. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्य सरकारकडून मकोकासारख्या कठोर कायद्याच्या वापराचा पर्याय विचाराधीन असल्याने गुटखाबंदीच्या अंमलबजावणीला नवे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.