बांधकामाचे प्रदूषण रोखण्याकडे दुर्लक्ष; ४५३ ठिकाणीच प्रणाली कार्यान्वित
पुणे, शहर प्रतिनिधी
बांधकामाच्या ठिकाणी होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी बंधनकारक केलेल्या ‘सेन्सर’ बसविण्याच्या नियमाकडे बांधकाम व्यावसायिकांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. ५ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी ‘एअर क्वालिटी सेन्सर’ बसवणे बंधनकारक असतानाही केवळ ४५३ ठिकाणीच ही प्रणाली कार्यान्वित केली आहे.
बांधकामाच्या ठिकाणी पीएम २.५ आणि पीएम १० या घातक धूळकणांचे उत्सर्जन होत आहे. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी सेन्सर बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. १५ डिसेंबर २०२५ रोजी यासंदर्भातील परिपत्रक काढून बांधकाम व्यावसायिकांना सेन्सर बसवणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानंतरही बहुतांश प्रकल्पांनी नियमांचे पालन केले नाही.
“बांधकाम प्रकल्पांवरील प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी सेन्सर प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. आतापर्यंत ४५३ प्रकल्पांवर सेन्सर बसवण्यात आले आहेत. ही प्रक्रिया संथ गतीने सुरू असली तरी येत्या काही दिवसांत बांधकाम व्यावसायिकांची बैठक घेऊन अंमलबजावणीचा वेग वाढवला जाईल. तसेच संबंधितांना नोटीस पाठवण्यात येईल.”
— अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता