पुणे: चाकणमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला – तिघांवर गुन्हा दाखल

चाकण: एका तरुणाने गुन्हेगारी सोडून सरळ मार्गाचा स्वीकार केला, मात्र हेच त्याच्या जीवावर बेतण्याची वेळ आली. “तू आमच्यासोबत राहत नाही, तुला आता दाखवतोच” असे म्हणत तिघा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. चाकण येथील मच्छी मार्केट परिसरात शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
याप्रकरणी साहिल रमेश शिंदे (वय १९, रा. महात्मा फुलेनगर, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अतुल अर्जुन तांबे (रा. आगरकरवाडी, चाकण), विजय पवार (रा. वाघेवस्ती, चाकण) आणि ओमकार मनोज बिसनारे (रा. चाकण नगर परिषदेजवळ, चाकण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिअरच्या बाटलीने डोक्यात वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल शिंदे हा फ्लेक्स लावण्याचे काम करतो. शुक्रवारी सायंकाळी तो आपल्या मित्रासोबत मच्छी मार्केट येथे उभा असताना संशयित आरोपी दुचाकीवर तेथे आले. अतुल तांबे याच्या हातात बिअरची बाटली होती. “तू आमच्यासोबत गुन्हे करायचा, आता आमच्या ग्रुपपासून दूर का?” असे विचारल्यानंतर साहिलने आपण सर्व काही सोडून दिले असून सध्या कामधंदा करत असल्याचे सांगितले.
यावर अतुल तांबे संतापला आणि “आम्ही इथले भाई आहोत, तुला आता दाखवतोच” असे म्हणत त्याने हातातील बिअरची बाटली फोडून साहिलच्या डोक्यात मारली. त्याच्यासोबत असलेल्या एकाने जमिनीवर पडलेला दगड उचलून साहिलच्या पाठीत मारला. त्यानंतर तिघांनी मिळून हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
घटनेमुळे परिसरात तणाव
ही घटना घडताच मच्छी मार्केटमधील दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली. साहिलला वाचवण्यासाठी त्याची आई धावली, तेव्हा आरोपींनी तेथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
चाकण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.