दाखला फक्त ६९ रुपयांचा, वसुली ६०० रुपये! कागदपत्रे मिळविण्यासाठी सुविधा केंद्रांवर नागरिकांची लूट, नियंत्रण कोणाचे
पिंपरी, ता. १६ : शहरातील ‘आपले सरकार’ आणि नागरी सुविधा केंद्रांवर शासकीय दाखल्यांसाठी नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे. ६९ रुपयांच्या दाखल्यासाठी ५०० ते ६०० रुपये उकळले जात असून, प्रशासकीय नियंत्रणाच्या अभावामुळे केंद्र चालकांचे फावले आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेमुळे सध्या उत्पन्न, जात आणि अधिवास प्रमाणपत्रांसाठी केंद्रावर गर्दी आहे. शासनाने दर निश्चित करूनही पिंपरी चिंचवडमधील २०० महा-ई-सेवा केंद्रांमध्ये मनमानी वसुली सुरू असल्याच्या अर्जदारांनी तक्रारी केल्या आहेत. अनेक केंद्रांवर शुल्काचे फलक गायब केले जात असून, जादा पैसे घेतलेली अधिकृत पावती दिली जात नसल्याचे समोर आले आहे. मुदत संपण्याच्या भीतीने विद्यार्थी व पालक निमूटपणे जादा पैसे देत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त रक्कम घेतल्यास, संबंधित केंद्र चालकावर दंडात्मक कारवाई किंवा फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. जास्तीचे पैसे आकारल्यास तहसील कार्यालयात तक्रार केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. पण, कारवाईबाबतची शिथिलता असल्याने नागरिकांना फटका बसत आहे.
निकाल जाहीर झाले असून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तसेच विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व परीक्षांचे अर्ज, शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे रहिवासी आणि अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र आणि तालुका रहिवासी प्रमाणपत्र असे विविध प्रमाणपत्रे काढावी लागत आहेत. काही ठिकाणी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची प्रमाणपत्रे काढण्यासाठी धावपळ सुरू आहे. प्रमाणपत्रे काढण्यासाठी नागरिक महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रात धाव घेत आहेत. शासनाने दाखल्यांसाठी दर निश्चित केले असले तरी दाखले काढणे बंधनकारक आहे. मात्र केंद्र चालकांकडून मनमानी पद्धतीने दर आकारले जात आहेत.
“महा-ई-सेवा केंद्रात उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गेलो असता त्यांनी ५०० रुपये मागितले. शासकीय दर आणि महा-ई-सेवा केंद्र चालकांच्या दरात मोठी तफावत आहे. नागरिकांची खुलेआम लूट सुरू आहे.”
— अर्जदार
“नागरिकांनी शासनाने निश्चित केलेले दर घ्यावेत. महा-ई-सेवा केंद्रचालक जास्तीचे पैसे घेत असतील तर नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी.”
— जयराज देशमुख, तहसीलदार, हवेली
दाखल्यांसाठी शुल्क आणि वस्तुस्थिती
दाखला दर कालावधी केंद्राकडून वसुली
सर्वसामान्य प्रतिज्ञापत्र ६९ १ २००
उत्पन्नाचा दाखला ६९ १५ ५००
स्थानिक वास्तव्याचा दाखला ६९ १५ २०० ते ३००
रहिवासी दाखला ६९ १५ २०० ते ३००
वय, अधिवास व राष्ट्रीयत्व ६९ १५ ५००
जात प्रमाणपत्र १२८ ४५ २००० ते ४०००
केंद्र सरकार जात प्रमाणपत्र १२८ ४५ १००० ते १५००
नॉन क्रीमिलेअर १२८ ४५ १००० ते १२००
आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र ६९ १५ ५०० ते ६००
महिला आरक्षण ६९ ३० ३०० ते ५००
ज्येष्ठ नागरिक दाखला ६९ १५ २०० ते ३००
महा-ई-सेवा केंद्र व नागरी सुविधा केंद्र चालकांनी दाखले देणे बंधनकारक आहे. मात्र केंद्र चालकांकडून मनमानी पद्धतीने दर आकारले जात आहेत.