Zika Virus Pune : पुण्यात पुन्हा नवे संकट? झिका व्हायरसचे रुग्ण वाढले

शहरात झिका विषाणूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोथरूडमधील गुजरात कॉलनीतील ६८ वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्…
पुणे : शहरात झिका विषाणूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.कोथरूडमधील गुजरात कॉलनीतील ६८ वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा झिका तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अवयव निकामी झाल्याने या रुग्णाचा मृत्यू झाला, असे रुग्णालयाने सांगितले. तर बाणेरमधील ७८ वर्षांच्या रुग्णाचाही मृत्यू झाल्यानंतर तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
परंतु, रुग्णाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. याबरोबरच काही दिवसांपूर्वी एरंडवणेतील ७६ वर्षांच्या आणि खराडीतील ७२ वर्षांच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता.
पुण्यात झिका विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत दिवसगणिक वाढ होत आहे. शुक्रवारी ६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ५८ वर पोहोचली.
आतापर्यंत मृत्यू पावलेल्या चार रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या चार रुग्णांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आरोग्य विभाग मृत्यू परीक्षण करणार आहे.
सुरूवातीला मुंढवा, वारजे याच परिसरात रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता शहरातील सर्वच परिसरात रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
या रुग्णांना सहव्याधी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यू झाल्यानंतर त्यांचा झिका तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मृत्यू झालेल्या या चारही रुग्णांच्या उपचारांची कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
नेमका मृत्यू कशामुळे झाला? याचा शोध घेण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागातर्फे मृत्यूंचे परीक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली.