येरवडा : गुरुचरणी वंदन! सानप सरांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

येरवडा परिसरातील ज्येष्ठ शिक्षक सानप सरांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर झाला असून त्यांच्या विद्यार्थ्यांनी व समाजातील मान्यवरांनी यानिमित्त हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
शिक्षक हा फक्त वर्गात ज्ञान देणारा नसून समाजाचा खरा शिल्पकार असतो, हे आपल्या कार्यातून सानप सरांनी सिद्ध केले आहे. केवळ पुस्तकातील धडेच नव्हे तर प्रामाणिकपणा, शिस्त, मेहनत, जिद्द आणि राष्ट्राप्रतीची जबाबदारी अशी जीवनमूल्ये त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवली आहेत. त्यांच्या शिकवणुकीमुळे हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत, हेच त्यांच्या कार्याचे खरे बक्षीस असल्याचे विद्यार्थी सांगतात.
माजी युनिट अध्यक्ष तुषार सावंत यांनी सांगितले, “सानप सरांसारखे शिक्षक हे समाजाचे दीपस्तंभ आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जागवलेली जिद्द व परिश्रमाची प्रेरणा ही राष्ट्राच्या विकासाची भक्कम पायरी ठरते. मला अभिमान आहे की अशा गुरुवर्यांचा विद्यार्थी होण्याचा मान मला लाभला.”
सानप सरांच्या अथक परिश्रमांचा आज महाराष्ट्रभर गौरव होत आहे. शिक्षणातून समाज परिवर्तन घडवण्याच्या त्यांच्या विचारांचा हा विजय असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
—