Weather Update : राज्याच्या अनेक भागात आज बरसणार मुसळधार; हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा
राज्यासह देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पहाटेपासून दिल्लीत मुसळधार पावसाने हजेरी लावली. तासाभरात दिल्लीत पाणी साचल्याचं चित्र आहे. अशातच आज देखील हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आजही राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यासह, कोकण, मराठवाड्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा. विदर्भातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा येथे जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पण सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही.
विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. वीज पडण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांनी झाडाखाली थांबू नये, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.
संपूर्ण राज्याला व्यापणाऱ्या मान्सूनने आता उत्तरेकडे आपला प्रवास सुरू केला आहे. काल गुरुवारी (ता. २७) मान्सूनने गुजरात व्यापला असून छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख बहुतांश भाग, बिहार, उत्तर प्रदेशाकडे मजल मारली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत देशाच्या बहुतांश भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे.