“पुणे रेल्वे स्थानकात जलमय स्थिती!” – व्हिडिओ

IMG_20240819_122525.jpg

पुणे : पावसामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारातच आता तळे साचू लागले आहे. या गु़डघाभर पाण्यातून वाट काढत प्रवाशांना स्थानकाच्या आतमध्ये पोहोचावे लागत आहे. एवढ्यावरच प्रवाशांचे दिव्य संपत नसून, गळके फलाट प्रवाशांच्या स्वागतासाठी तयार आहेत.

सगळ्यातून कसरत करीत जीवावर उदार होत रेल्वे गाडीत चढण्याचे आव्हान सध्या प्रवाशांना पेलावे लागत आहे.

Link source: Pune news network

पुणे रेल्वे स्थानकाच्या गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात या स्थानकाची अवस्था अतिशय खराब होते. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आपला तोल सांभाळायचा की हातातील बॅगा सांभाळायच्या असा प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहत आहे. या गुडघाभर पाण्यातून वाट काढताना प्रवाशांची तारांबळ उडत आहे. याचबरोबर अनेक फलाटांवर पावसाचे पाणी गळत आहे. यामुळे हे फलाट निसरडे झाले आहेत. रेल्वे गाडी आल्यानंतर प्रवासी मोठ्या संख्येने गाडी पकडण्यासाठी धावतात. या निसरड्या फलाटांमुळे मोठा अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अनेक प्रवाशांनी समाज माध्यमांतून याबाबत संताप व्यक्त केला आहे. अनेक जणांनी रेल्वे स्थानकातील साचलेल्या पाण्याची छायाचित्रे आणि चित्रफितीही समाज माध्यामावर टाकल्या आहेत. रेल्वे स्थानकात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना कशा प्रकारे प्रवाशांना कसरत करावी लागत आहे, याबद्दलचे चित्र अनेकांनी यातून दाखविले आहे. रेल्वे प्रशासनाने मात्र प्रवेशद्वारापेक्षा बाहेरील रस्त्याची उंची वाढल्याचे कारण पाणी साचण्यासाठी दिले आहे. ही समस्या तातडीने निदर्शनास आली असून, कर्मचारी उपाययोजना करीत आहेत, असे उत्तरही रेल्वे प्रशासनाने दिले आहे.

पुणे रेल्वे स्थानकातील फलाटांवर पावसाचे पाणी गळत आहेत. यामुळे ते निसरडे झाले असून, प्रवाशांसाठी असुरक्षित बनले आहेत. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ते धोकादायक बनले आहेत. स्थानकाच्या दुरूस्तीची वारंवार मागणी प्रवाशांकडून केली जात असून, त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. -विकास देशपांडे, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती

Spread the love

You may have missed