सह्याद्री रुग्णालय व्यवहार प्रकरणी ट्रस्टचा खुलासा : नियमभंगाचा आरोप फेटाळला; महापालिकेच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर; विनामूल्य उपचारांच्या अटींचे पालन असल्याचा दावा

पुणे – सह्याद्री हॉस्पिटल समूहातील बहुतांश समभाग मणिपाल ग्रुपकडे हस्तांतरित झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. नियमभंग झाल्याचा आरोप करत अॅड. सुश्रुत कांबळे यांनी पाठवलेल्या पत्राचा आधार घेऊन ही कारवाई करण्यात आली होती.
यास उत्तर देताना कोकण मित्र मंडळ ट्रस्टने स्पष्ट केले आहे की, कोणताही नियमभंग झाला नसून जमीन किंवा रुग्णालय हस्तांतरित करण्यात आलेले नाही. ट्रस्टने सहाय्यक आरोग्य अधिकारी यांच्याकडे सविस्तर खुलासा सादर केला असून, महापालिकेच्या अटींचे संपूर्ण पालन केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
जमिनीचा आणि इमारतीचा तपशील:
कोकण मित्र मंडळ ट्रस्टला पुणे महापालिकेने २७ फेब्रुवारी १९९८ रोजी आडेपट्टा कराराद्वारे जमीन दिली होती. ही जमीन महापालिकेच्या मालकीचीच असून, त्यावरील इमारत ट्रस्टच्या नावावर आहे. ट्रस्टने जमीन किंवा रुग्णालय कोणत्याही कंपनी, व्यक्ती अथवा मणिपाल ग्रुपला हस्तांतरित केलेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नर्सिंग होम परवान्याबाबत माहिती:
रुग्णालयासाठी २००४ मध्ये मिळालेला नर्सिंग होम परवाना अजूनही ट्रस्टच्या नावावरच असून, वेळोवेळी झालेल्या बदलांना महापालिकेची परवानगी घेतलेली आहे. या परवान्याची प्रतही महापालिकेकडे सादर करण्यात आली आहे.
विनामूल्य उपचारांबाबत स्पष्टीकरण:
महापालिकेच्या अटींनुसार, शिफारस झालेल्या रुग्णांसाठी विनामूल्य खाटा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे. मागील तीन आर्थिक वर्षांत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ५०० ‘बेड डेज’ विनामूल्य उपचार करण्यात आले असून, करारातील ५० ‘बेड डेज’च्या अटीपेक्षा अनेकपटीने जास्त सेवा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
महेश कुलकर्णी यांचा दावा:
ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी महेश कुलकर्णी यांनी पत्राद्वारे दिलेल्या खुलाशात म्हटले आहे की, “महापालिकेच्या प्रत्येक अटीचे पालन करण्यात आले आहे. कोणत्याही रुग्णास उपचार नाकारण्यात आलेले नाही. आमच्या सेवा नियमबद्ध व पारदर्शक पद्धतीने सुरू आहेत.”
महापालिका आता ट्रस्टच्या खुलाशाचा आढावा घेऊन पुढील कायदेशीर पावले टाकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.