गाण्याचा मोह ठरला महाग – तहसिलदार थोरात निलंबित; खुर्चीवर गाणं गायलं; आता तीच खुर्ची रिकामी – व्हिडिओ

संभाजीनगर – गायकाची खुर्ची आणि तहसिलदाराची खुर्ची यात गल्लत झाली की काय? असा प्रश्न आता राज्यभर चर्चेत आहे. बदलीनंतरच्या निरोप समारंभावेळी “यारा तेरी यारी को…” हे गाणे खुर्चीवर बसून गाण्याचा मोह तहसिलदार प्रशांत थोरात यांना एवढा भारी पडला की थेट गाण्याच्या तालावर निलंबनाचा ठेका बसला!
उमरी येथे सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या निरोप समारंभावेळी थोरात साहेबांनी तहसिलदाराच्या खुर्चीवर बसून सूर आळवले. कोणीतरी तो व्हिडिओ टिपला आणि सोशल मीडियावर टाकला. पुढे काय, व्हायरलच्या वाऱ्यातून थेट वादळ उठलं!
पहा व्हिडिओ
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः दखल घेतली आणि काही क्षणांतच आदेश झर्रकन निघाले. निरोप समारंभाचं गाणं थेट ‘निलंबन गीत’ बनलं!
खुर्ची आहे की रंगमंच?
शासकीय खुर्ची म्हणजे जबाबदारीचं प्रतीक. पण ती गायकाच्या स्टेजसारखी वापरली तर काय होतं, हे थोरात साहेबांनी प्रत्यक्ष अनुभवून घेतलं. जनतेच्या समस्यांवर उपाय शोधण्याऐवजी खुर्चीवर बसून गाणी गाणं लोकांना पचलं नाही, आणि अखेर सरकारलाही पचलं नाही.
सोशल मीडियावरचा “सूर” आणि कारकीर्दीतील “बे सुर”
आजच्या काळात सोशल मीडिया म्हणजे आगीसारखं. चांगलं काम केलं तर कौतुकाचा पूर, आणि एखादी चूक केली तर टीकेचा भडका. थोरात यांचा व्हिडिओ पाहून अनेकांनी टोमणा मारला –
“खुर्ची मिळाली कामासाठी, गाण्यासाठी नाही!”
इशारा बाकीच्यांना!
थोरात यांचं निलंबन हे केवळ एक कारवाई नाही, तर राज्यातील इतर अधिकाऱ्यांसाठी स्पष्ट इशारा आहे. खुर्चीवर बसून गाणं गायलं तर चालेल, पण त्याची किंमत ‘नोकरीच्या सूरातली विस्कटलेली ताल’ असू शकते.
म्हणजेच काय…
तहसिलदार थोरात यांचं गाणं लोकांच्या कानावर गोड पडलं असेल कदाचित, पण सरकारच्या कानावर ते सरळ खटकून गेलं. आणि आता त्यांचे सूर जमलेत ‘निलंबनाच्या ढोलावर’!
—