कोकाटेनंतर पुण्यातील माजी उपमहापौरांचा पराक्रम; बैठकीत गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल, समाजात संताप

IMG_20250815_103442.jpg

पुणे – राज्याचे माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता पुण्याचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्या मोबाईलवर गेम खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार महत्त्वाच्या बैठकीदरम्यान घडल्याचे समोर आल्यानंतर आंबेडकरी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पहा व्हिडिओ

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, १५ ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यात आंबेडकरी चळवळ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा मिळवण्याच्या मागणीसाठी होणाऱ्या या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी विविध वाड्या-वस्त्यांवर बैठका आयोजित केल्या जात आहेत. अशाच एका बुध्द विहारातील बैठकीत गंभीर चर्चा सुरू असताना, वरिष्ठ नेते सिद्धार्थ धेंडे हे मोबाईलवर गेम खेळताना व्हिडिओत स्पष्ट दिसले.

या घटनेमुळे उपस्थित नागरिकांमध्ये आणि समाजात संतापाची लाट उसळली आहे. “नेतेच जर बैठकीचे गांभीर्य न ठेवता जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असतील, तर लोकांना रस्त्यावर उतरावे लागते,” असा रोष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “मी माइंड रिफ्रेश करण्यासाठी गेम ओपन केला होता. दुसरे वक्ते भाषण करत असताना तो उघडला आणि त्यानंतर मी स्वतः आठ मिनिटांचे भाषण केले. हा व्हिडिओ माझ्या स्थानिक विरोधकांनी मुद्दाम राजकीय षड्यंत्र म्हणून व्हायरल केला आहे. ही बैठक प्रशासकीय किंवा महापालिकेच्या निर्णयांशी संबंधित नसून आंदोलनाच्या तयारीचा एक भाग होती.”

तथापि, कार्यकर्त्यांचे मत आहे की, आंदोलनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीतही गंभीरता न दाखवणे हे जनतेच्या विश्वासाला धक्का देणारे आहे, आणि या प्रकारावर कार्यकर्त्यांकडून तीव्र टीका होत आहे.

Spread the love