येरवडा कारागृहात अत्याधुनिक प्रतीक्षालय; दीड हजार नातेवाईकांना थांबता येणार

0
IMG_20250521_104550.jpg

पुणे, २१ मे – राज्यातील सर्वात मोठ्या येरवडा कारागृहाबाहेर कैद्यांची भेट घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने नातेवाईकांची गर्दी होत असते. आता या नातेवाईकांच्या सोयीसाठी कारागृह परिसरात अत्याधुनिक प्रतीक्षालय उभारण्यात आले आहे. एकावेळी तब्बल दीड हजार नातेवाईक येथे थांबू शकतात. हे प्रतीक्षालय राज्यातील कारागृहांमध्ये सर्वांत मोठे ठरले आहे.

सायबेज फाउंडेशनने सामाजिक दायित्व निधीच्या (CSR) माध्यमातून हे प्रतीक्षालय उभारण्यासाठी कारागृह प्रशासनाला आर्थिक मदत दिली. याआधीही फाउंडेशनने महिला कैद्यांच्या मुलांसाठी पाळणाघर व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

नवीन प्रतीक्षालयात संगणकीकृत नोंदणी कक्ष असून, कैद्यांची भेट घेण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना येथेच नोंदणी करता येणार आहे. तसेच, आसन व्यवस्था, प्रसाधनगृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, उपाहारगृह आणि मुलाखत कक्षाकडे जाण्यासाठी विशेष मार्ग यासारख्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या प्रतीक्षालयाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे, सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण नथानी, सायबेज फाउंडेशनच्या प्रमुख रितू नथानी, येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ आणि उपअधीक्षक पल्लवी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

कैद्यांच्या कुटुंबीयांसाठी उभारण्यात आलेल्या या प्रतीक्षालयात वकिलांसाठीही स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली आहे. “कारागृहाबाहेर मोकळ्या जागेत ताटकळत उभ्या असलेल्या नातेवाईकांचे हाल पाहून प्रतीक्षालय उभारण्याचा निर्णय घेतला,” असे अरुण नथानी यांनी यावेळी सांगितले. अवघ्या १४ महिन्यांत हे प्रतीक्षालय पूर्ण झाले असून, हे एक सकारात्मक सामाजिक पाऊल मानले जात आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed