गर्भवती महिला पोलिसांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा; साडी नेसून करता येणार ड्युटी

0

गर्भवती महिला पोलिसांसाठी साडी परिधानाची परवानगी : राज्य सरकारने महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, गर्भवती असताना महिला पोलिस कर्मचाऱ्यांना साडी नेसण्याची मुभा देण्यात आली आहे.

या संदर्भात राज्य सरकारने बुधवारी अधिकृत आदेश जारी केला आहे. यासाठी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना गर्भधारणेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, संबंधित कर्मचाऱ्यांना डीजीपी कार्यालयाकडून साडी नेसण्याची अधिकृत परवानगी दिली जाईल.

गर्भधारणेच्या आणि प्रसूतीनंतरच्या कालावधीत महिला पोलिस कर्मचाऱ्यांना गणवेशाऐवजी साडी नेसण्याची परवानगी मिळणार आहे. यासाठी गर्भधारणेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात महिलांना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. या काळात पोलीस गणवेशातील बेल्टचा वापर केल्याने महिलांच्या आरोग्यावर आणि गर्भावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे महिलांना गणवेश घालणे कठीण होते. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

डीजीपी कार्यालयाने पूर्वीच गर्भवती महिला पोलिसांना गणवेश घालण्यापासून सूट देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता, जो काही दिवसांपासून प्रलंबित होता. अखेर बुधवारी सरकारने या संदर्भात शासन निर्णय (GR) काढत गर्भधारणेदरम्यान गणवेश न घालण्याची शिथिलता जाहीर केली.

महिला पोलिसांसाठी दिलासा

हा निर्णय गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या महिला पोलिस अधिकाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आहे. गर्भवती महिलांना गणवेश आणि बेल्ट घालणे कठीण जात होते आणि त्याचा परिणाम गर्भावर होऊ शकतो, असे निरीक्षण करण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गर्भवती महिला पोलिस कर्मचाऱ्यांची गैरसोय कमी होणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *