धर्मादाय रुग्णालयांना राज्य सरकारचा आदेश : सर्व आरोग्य योजना तात्काळ राबवा, आपत्कालीन रुग्णांवर त्वरित उपचार करा

पुणे : निर्धन रुग्ण निधी (IPF) शिल्लक नसल्यामुळे अनेक रुग्ण आवश्यक उपचारांपासून वंचित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने मोठा निर्णय घेत सोमवारी सर्व धर्मादाय रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम यांसह इतर सर्व आरोग्य योजना तात्काळ राबवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अधिकृत शासन निर्णयदेखील जाहीर करण्यात आला आहे.
नुकत्याच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होऊ इच्छिणाऱ्या एका महिलेला नाकारल्याच्या घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी धर्मादाय विभागाने समिती नियुक्त केली होती. समितीच्या शिफारशींवर आधारित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी आता निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित खाटांचा उपयोग नियोजित उपचार व शस्त्रक्रियांसाठी करावा. यासाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्षा’ची पूर्वमान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णाला तात्काळ भरती करून उपचार द्यावेत. यानंतर ४८ तासांच्या आत ऑनलाइन प्रणालीद्वारे कार्योत्तर मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
धर्मादाय रुग्णालयांसाठी महत्त्वाच्या सूचना :
निर्धन रुग्ण निधी (IPF) खात्याबाबतची माहिती नियमितपणे अद्ययावत करून ती धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावर अपलोड करावी.
कोणत्याही रुग्णाकडून अवाजवी अनामत रक्कम घेणे टाळावे.
अनामत रकमेअभावी रुग्णांना उपचार नाकारले जाणार नाहीत, याची खास खबरदारी घ्यावी.
आपत्कालीन परिस्थितीत – विशेषतः गर्भवती महिलांच्या बाबतीत – तात्काळ उपचार करावेत.
फार्मसी व चाचण्या बाह्य स्त्रोतांकडे दिल्या असल्यास, त्या उत्पन्नातील किमान दोन टक्के रक्कम IPF निधीत वर्ग करणे बंधनकारक.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गरीब, गरजूंना आवश्यक ते उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, धर्मादाय रुग्णालयांची सामाजिक जबाबदारी अधिक व्यापक स्वरूपात पार पाडण्यावर भर दिला गेला आहे.