निवडणुकीपूर्वी बेकायदा होर्डिंग्ज हटवण्यासाठी महाराष्ट्रात विशेष मोहीम: उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई: सरन्यायाधीश डी.के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने राजकीय पक्षांना त्यांच्या पूर्वीच्या आश्वासनांची आठवण करून देत स्पष्ट केले की, कोणताही कार्यकर्ता बेकायदेशीर होर्डिंग्स किंवा बॅनर्स लावणार नाही, याची काळजी घ्यावी.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा होर्डिंग्स आणि बॅनर्सविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने सर्व नागरी संस्थांना दिले आहेत. या मोहीमेचा उद्देश राजकीय पक्ष तसेच सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी लावलेल्या अनधिकृत जाहिरातींमुळे सार्वजनिक रस्त्यांचे नुकसान होऊ नये, याची खबरदारी घेणे आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, या मोहिमेचे काम जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि इतर महसूल अधिकाऱ्यांनी वैयक्तिक रुची घेऊन प्रभावीपणे पूर्ण करावे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 नोव्हेंबरला होणार आहे.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकांच्या काळात शहरातील बेकायदेशीर होर्डिंग्स आणि बॅनर्सवर मोठ्या प्रमाणात आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.