फटाक्यांचा धूर आरोग्यासाठी घातक; तज्ज्ञांचा इशारा – प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा

पुणे | प्रतिनिधी दिव्यांची झगमगाट आणि आनंदाचे वातावरण असलेल्या दिवाळीत फटाके अनिवार्य मानले जातात. मात्र, या फटाक्यांमधून निर्माण होणारा धूर आणि आवाज आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
फटाक्यांमध्ये तांबे, कॅडमियम, सल्फर, अॅल्युमिनियम आणि बोरियमसारखी विषारी रसायने असतात. ही रसायने हवेत मिसळून श्वसनाचे विकार वाढवतात. त्यामुळे दम्याचे रुग्ण, लहान मुले आणि वृद्ध नागरिक यांना विशेषतः त्रास होऊ शकतो. फटाक्यांच्या धुरामुळे श्वास घेण्यात अडचण, डोळ्यांची जळजळ, त्वचेची अॅलर्जी, डोकेदुखी आणि खोकल्याचा त्रास वाढतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. मिलिंद भोई म्हणाले,
“फटाक्यांच्या तीव्र आवाजामुळे कानाच्या पडद्यांना इजा होऊ शकते, श्रवणशक्ती कमी होऊ शकते आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांना गंभीर धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत दिवाळी साजरी करावी.”
तज्ज्ञांच्या मते, दिवाळीच्या काळात हवेतील धुलिकणांचे प्रमाण वाढल्याने ब्रॉन्कायटिस, अस्थमा अटॅक आणि फुफ्फुसाचे विकार अधिक तीव्र होतात.
🔹 अशी घ्या काळजी
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा.
फटाके टाळा किंवा कमी प्रदूषण करणारे फटाके वापरा.
मोकळ्या जागेतच फटाके फोडा.
लहान मुलांवर लक्ष ठेवा.
हृदयाचे आजार असलेल्यांनी फटाक्यांपासून दूर राहावे.
घरात एअर प्युरिफायरचा वापर करा.
तज्ज्ञांचा सल्ला स्पष्ट आहे — आनंद साजरा करा, पण आरोग्य आणि पर्यावरण दोन्ही जपा!