येरवडा बाजारात आकाशचिन्ह विभागाची धडक कारवाई
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढारी नेत्यांचे फ्लेक्स हटवले; नागरिकांचा सवाल – एवढे दिवस झोप का?
पुणे : येरवडा बाजार परिसरात आज सकाळपासून महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने जोरदार कारवाई करत राजकीय पुढारी व नेत्यांचे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर काढण्यास सुरुवात केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक ‘जाग’ आलेल्या प्रशासनाच्या या कारवाईमुळे परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
पहा व्हिडिओ
दीर्घकाळापासून येरवडा बाजार परिसरात रस्त्याच्या दुतर्फा, चौकात आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स झळकत होते. मात्र, आज सकाळी महापालिकेचे कर्मचारी आणि वाहनांसह पथके दाखल होताच एकामागून एक फ्लेक्स हटवण्यात आले. काही ठिकाणी तर नेत्यांचे मोठे होर्डिंग्ज उतरवताना वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली.
या कारवाईवर नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. “निवडणूक जवळ आली कीच नियम आठवतात का? एवढ्या दिवसांत हे फ्लेक्स दिसत नव्हते का?” असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला. नियमित काळात कारवाई न होता केवळ निवडणुकीच्या काळातच धडक कारवाई केली जाते, हा प्रशासनाचा दुटप्पीपणा असल्याची टीकाही करण्यात येत आहे.
दरम्यान, आकाशचिन्ह विभागाकडून अनधिकृत फ्लेक्स, बॅनर यावर पुढील काही दिवस कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, ही कारवाई कायमस्वरूपी आणि भेदभावाविना होणार की निवडणूक संपताच पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.