पाच हजारांहून अधिक रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; त्रुटी न दूर केल्यास परवाने होणार रद्द

मुंबई – राज्यातील तब्बल २६ हजार ३५४ रुग्णालयांच्या तपासणीत ५,१३४ रुग्णालये महाराष्ट्र नर्सिंग कायद्याचे नियम पाळण्यात अपयशी ठरली आहेत. दरपत्रक, हेल्पलाइन क्रमांक यासह आवश्यक माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक असतानाही अनेक रुग्णालयांनी या बाबींची पूर्तता केली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने संबंधित रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या तपासणीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. मनमानी पद्धतीने उपचारांचा खर्च आकारणे, रुग्णांना व नातेवाइकांना खर्चाची माहिती न देणे, अपुऱ्या सुविधा, मान्यता नसलेले उपचार, तसेच सुरक्षेचा अभाव अशा तक्रारींचा भडिमार रुग्णालयांविरोधात झाला आहे.
३० दिवसांत त्रुटी दूर न झाल्यास परवाना निलंबित
चौकशीनंतर रुग्णालयांना त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ३० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या कालावधीत सुधारणा न केल्यास संबंधित रुग्णालयांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
जिल्हावार आकडेवारी
पुणे : १,६५०
छ. संभाजीनगर : ९०१
लातूर : ५८९
नाशिक : ५८४
कोल्हापूर : ४२५
अकोला : ४०९
नागपूर : ३६१
मुंबई-ठाणे : २१५
या आकडेवारीतून ग्रामीण व शहरी भागातील रुग्णालयांची बेफिकिरी स्पष्ट होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
—