ससून रुग्णालयातील धक्कादायक दुर्लक्ष? तरुणीच्या मृत्यूवर कुटुंबीयांचे गंभीर आरोप – व्हिडिओ
पुणे – ससून सर्वोपचार रुग्णालयाची कथित निष्काळजीपणा आणि तुच्छतापूर्ण वागणूक पुन्हा एकदा चव्हाट्यावर!
२५ नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या एका तरुणीचा २७ नोव्हेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत झाली, अतिरक्तस्राव झाला… अशी रुग्णालयाची रटाळ स्पष्टीकरणं असली तरी कुटुंबीयांचे आरोप मात्र नेहमीसारखी ‘सिस्टमची चूक’ नव्हे—तर थेट डॉक्टरांचे बेफिकीर वर्तन दाखवणारे आहेत.
पहा व्हिडिओ
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीवेळी मुलगी असह्य वेदनांनी तडफडत होती. आवश्यक असलेली “कात्री” मागितली होती, पण डॉक्टरांनी शांतपणे “उपचार सुरू आहेत” असा सरकारी ढंगाचा दिखावा करत वेळ मारून नेला. डॉक्टरांनी आकडेमोड पूर्ण करेपर्यंत मुलीची प्रकृती गंभीर झाली. शेवटी, नेहमीच्या ‘हेवी ब्लिडिंग’च्या सबबीखाली तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली.
पण कुटुंबीय प्रश्न विचारतात—
“जर वेळेत प्रक्रिया केली असती, तर आज आमची मुलगी जिवंत असती का?”
मृतदेहावर मारहाणीप्रमाणे खुणा दिसल्याचा धक्कादायक आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे या मृत्यूभोवती आणखीच संशयाचे ढग दाटून आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने पारदर्शकता दाखवण्याऐवजी नेहमीच्या पद्धतीची उत्तरं देऊन सुटका करून घेतल्याची चर्चा रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये आहे.
घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून कुटुंबीयांनी सखोल तपासाची मागणी केली आहे.
प्रश्न असा – ससूनसारख्या राज्यातील प्रमुख सरकारी रुग्णालयात अजून किती वेळा निष्काळजीपणाचे बळी द्यावे लागणार?
आरोग्य व्यवस्थेतील ढिलाई आणि बेफिकिरी किती आणखी जीव घेणार, याचे उत्तर द्यायला प्रशासन तयार आहे का? की पुन्हा एकदा कागदोपत्री चौकशी करून विषय थंडावण्याची वाट बघायची?