येरवड्यात विना परवानाधारक फटाक्यांची विक्री; नागरिकांची प्रशासनाकडे कारवाईची मागणी

पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येरवड्यात विविध ठिकाणी फटाक्यांची विक्री जोरात सुरू झाली असली, तरी अनेक दुकाने व स्टॉल विना परवाना चालवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिक आणि परवानाधारक विक्रेत्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, तात्काळ कारवाई करण्याची मागणी आकाश चिन्ह विभागाकडे करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “अनेक ठिकाणी खुलेआम तसेच छुप्या पद्धतीने फटाक्यांची विक्री सुरू आहे. हे अत्यंत धोकादायक असून, अशा विक्रेत्यांविरोधात तातडीने कारवाई व्हावी.”
दरम्यान, परवानाधारक स्टॉल धारकांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “आम्ही सर्व नियमांचे काटेकोर पालन करत अधिकृत परवानगी घेतलेली आहे. आकाश चिन्ह विभागाचे अधिकारी नियमित पाहणी करतात. मात्र विना परवाना विक्री करणारे नियम पाळणाऱ्यांना आर्थिक तोटा पोहोचवत आहेत.”
“जर या अनधिकृत विक्रीतून एखादा अपघात, आग किंवा जीवितहानी झाली, तर जबाबदारी कोणाची राहील?” असा प्रश्न नागरिक आणि व्यापारी वर्गाने उपस्थित केला आहे.
सध्या येरवड्यातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे स्टॉल उभे राहिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सर्व स्टॉलची परवानगी तपासून, विना परवाना फटाके विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसली तरी, दिवाळीच्या काहीच दिवसांवर आलेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.