महसूल सहाय्यक लाच घेताना रंगेहात ताब्यात

इंदापूर : तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक कावेरी विजय खाडे (वय ४८, रा. संघवीनगर, भिगवण रोड, बारामती) यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार माहिती अशी की, भांडगाव येथील शेतकऱ्याच्या वडिलांच्या ३९ गुंठे जमिनीला जाण्यासाठी रस्ता नव्हता. या रस्त्यासाठी २०२० पासून तहसीलदार कार्यालयात दावा सुरू होता. निकालाच्या कागदपत्रांची प्रक्रिया तक्रारदाराच्या बाजूने तयार करण्यासाठी कावेरी खाडे यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजता कावेरी खाडे यांनी २५ हजार रुपये स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.