जागतिक निकषांखाली फेल पुण्याची आरोग्यव्यवस्था; महापालिकेच्या रुग्णालयात फक्त एकच आयसीयू : 60 लाख लोकसंख्येसाठी अपुरी सुविधा

0
pmc-k-m-rugnalay_2024081285289.jpg

पुणे, प्रतिनिधी : 60 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात केवळ 15 ते 20 टक्के नागरिक शासकीय आरोग्य सेवांचा लाभ घेतात. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या सुमारे 5 ते 10 लाख लोकांसाठी केवळ एकच आयसीयू सुविधा उपलब्ध आहे. ही स्थिती आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक असून, गंभीर रुग्णांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अद्यापही अपुरी व्यवस्था आहे.

कमला नेहरू रुग्णालयातील एकमेव आयसीयू सध्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर चालतो आहे. त्यामुळे येथे मोफत उपचार मिळत नाहीत. दररोज तीन ते चार हजार रुपये शुल्क आकारले जाते. परिणामी, आपत्कालीन रुग्णांना ससून रुग्णालयात हलवले जाते. महापालिकेला तृतीय सेवा देणे बंधनकारक नाही, असे उत्तर आरोग्य विभागाने दिले आहे.

“दैनिक पुढारीने” दिलेल्या वृत्तानुसार,महापालिकेच्या अखत्यारीत कमला नेहरू, डॉ. नायडू यांसारख्या रुग्णालयांसह 19 दवाखाने कार्यरत आहेत. यांपैकी अनेक ठिकाणी प्रसूती कक्ष व ऑपरेशन थिएटरसारख्या सुविधा असूनही आयसीयू सुविधा केवळ कमला नेहरूमध्ये आहे. येथे फक्त 15 खाटा व 10 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. प्रत्येक शिफ्टमध्ये एक इंटेन्सिव्हिस्ट, दोन नर्सेस व तीन हाउसकीपिंग कर्मचारी काम करतात.

महापालिकेचा आरोग्य विभाग केंद्र सरकारच्या सीजीएचएस योजनेपेक्षा एक टक्का कमी दराने उपचार देतो, असे सांगते. तरीही प्रत्यक्षात दररोजचा खर्च चार ते पाच हजार रुपयांपर्यंत जातो. शासकीय रुग्णालयातही आयसीयू दर एवढे चढे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

कोविडनंतरच्या सुविधा गमावल्या

कोरोना महामारीच्या काळात महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात अनेक आयसीयू व व्हेंटिलेटर सुविधा उभारल्या होत्या. परंतु महामारीनंतर या सुविधा मोडीत काढण्यात आल्या किंवा खाजगी संस्थांकडे सुपूर्द करण्यात आल्या. या सुविधांचा योग्य वापर करून सातत्याने कार्यरत ठेवले असते, तर आज गंभीर रुग्णांसाठी मोठा आधार ठरला असता, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव महत्त्वाचा अडसर

महापालिकेला स्वतःचा आयसीयू चालवण्यासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरांची गरज भासते. मात्र, शासनाच्या मर्यादित वेतनश्रेणीमुळे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत, अशी कबुली आरोग्यप्रमुख डॉ. निना बोराडे यांनी दिली. त्यामुळे जाहिराती देऊनही डॉक्टर मिळत नाहीत आणि पीपीपी तत्वावरच सेवा सुरु ठेवावी लागते.

ससूनवरील भार वाढतच

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तृतीयक सेवा अपुरी असल्यामुळे ससून रुग्णालयावरचा ताण दिवसेंदिवस वाढतो आहे. ससूनमध्ये 1296 खाटांपैकी 180 आयसीयू खाटा आहेत. पुणे आणि जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाऱ्या रुग्णांमुळे आयसीयूमध्ये कायम ‘वेटिंग’ असते. महापालिकेने प्राथमिक आणि द्वितीय सेवा सक्षमपणे दिल्यास ससूनवरील ताण कमी होऊ शकतो, असे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी स्पष्ट केले.

आरोग्य सेवा बळकट करण्याची गरज

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार, एक लाख लोकसंख्येसाठी किमान पाच आयसीयू खाटा असाव्यात. या हिशोबाने पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये किमान 200 आयसीयू खाटांची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या केवळ 15 असून, नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed