पुणे, येरवडा | लक्ष्मीनगरमध्ये ड्रेनेज पाईपलाईनचे कामामुळे खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त, दुकानदार संतप्त – पहा व्हिडिओ

0
IMG_20250705_201717.jpg

पुणे, येरवडा | प्रतिनिधी  येरवडा येथील लक्ष्मीनगर परिसरातील क्रांतिवीर लहुजी वस्ताद सांस्कृतिक हॉल समोर गेल्या महिन्यापासून सुरु असलेले ड्रेनेज पाईपलाईनचे काम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. भर पावसाळ्यात रस्त्याच्या मध्यभागी खोल खड्डे खोदले गेले असून, यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.

स्थानीय नागरिकांच्या सांगण्यानुसार, या कामामुळे अनेक ठिकाणी घरगुती ड्रेनेज पाईप आणि नळ पाईप फुटले आहेत. परिणामी, सांडपाण्याची गळती व पाणीपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. “पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारची कामे सुरू करणे म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ आहे,” असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले.

पहा व्हिडिओ

या ठिकाणी असलेल्या दुकानदारांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे ग्राहकांची ये-जा अडथळ्यात येत असून, व्यवसायावर थेट परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे.

“आमच्या धंद्यावर या कामाचा परिणाम होत आहे. खड्ड्यांमुळे ग्राहक दुकानातच येत नाहीत. शिवाय, चेंबर व ड्रेनेजच्या दुर्गंधीमुळे वातावरणही अस्वच्छ झाले आहे,” अशी खंत एका स्थानिक दुकानदाराने व्यक्त केली.

पावसाळ्यात हे काम सुरू करण्यास पुणे महानगरपालिकेने ठेकेदाराला परवानगी कशी दिली? असा सवाल सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

संबंधित यंत्रणांनी तातडीने या रस्त्याचे खड्डे बुजवून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Spread the love

Leave a Reply