पुणे: कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट! नागरिक हैराण

0
amitesh-kumar_V_jpg-1280x720-4g.webp

पुणे, दि. १ फेब्रुवारी: कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे अवैध धंदे सुरू असून, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गावठी दारू, अमली पदार्थ, जुगार आणि सट्टेबाजीसारखे धंदे खुलेआम सुरू असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असल्या तरी, पोलिस कारवाईसंदर्भात केवळ आश्वासनांवरच समाधान मानत असल्याची स्थिती आहे.

गावठी दारू, अमली पदार्थांचा बाजार तेजीत
खडीमशीन चौकातील एका खाजगी प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणावर गावठी दारूचे कॅन आढळून आल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली. मात्र, पोलिसांकडून यावर ठोस कारवाई झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुरतवाला कॉलनी आणि कौसरबाग परिसरातही अमली पदार्थांची मुक्त विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे.

अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढतेय
अवैध धंद्यांमुळे अल्पवयीन मुलांचे भवितव्य अंधारात जात आहे. सहज उपलब्ध होत असल्याने गांजा ओढण्याचे प्रमाण वाढले असून, टोळक्यांमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. गुटखा आणि इतर नशेच्या वस्तू वाइन शॉपच्या बाहेरील टपऱ्यांवर खुलेआम विक्रीस आहेत.

जुगार आणि सट्ट्याचे अड्डे बिनधास्त सुरू
काकडे वस्ती आणि गोकुळनगरमध्ये जुगाराचे अड्डे खुलेआम सुरू आहेत. ऑनलाइन लॉटरी सेंटरच्या नावाखाली बेकायदा सट्टेबाजी सुरू असून, दुकानांना पडदे लावून अवैध व्यवसाय चालवल्या जात असल्याची माहिती मिळत आहे.

मद्यपींचे अड्डे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
बोपदेव घाट रस्ता, खडीमशीन चौक, गोकुळनगर चौक आणि वाइन शॉप परिसरात मद्यपींचे अड्डे तयार झाले आहेत. रस्त्यावरच दारू प्यायली जात असल्याने सार्वजनिक ठिकाणी अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोलिसांचा दावा – तातडीने कारवाई करू
या प्रकारांबाबत पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, “अवैध धंद्यांवर आमचे पूर्ण लक्ष आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी अशा बाबी पोलिसांना कळवल्यास तातडीने कारवाई केली जाईल. कोणतीही हयगय केली जाणार नाही.”

नागरिकांचा सवाल – पोलिसांचे अभय आहे का?
नागरिकांमध्ये वाढत्या गुन्हेगारीबाबत भीती निर्माण झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने पोलिस प्रशासनाकडून या अवैध धंद्यांना अभय दिले जात आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *