पुणे: महापालिकेची अनधिकृत फलकांविरोधात धडक कारवाई; ८८ अनधिकृत फलक उघड, २४ पाडले ; नागरिकांच्या सुरक्षेला धोका!

पुणे | प्रतिनिधी
शहराच्या कानाकोपऱ्यात उभारण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात आलेले हे फलक केवळ महानगरपालिकेच्या महसुलावर घाला घालणारे ठरत नाहीत, तर नागरिकांच्या सुरक्षिततेलाही मोठा धोका पोहोचवत आहेत.
महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने नुकत्याच राबवलेल्या विशेष मोहिमेत एकूण ८८ अनधिकृत फलक सापडले असून त्यापैकी २४ फलक तातडीने पाडण्यात आले. नगररस्ता-वडगावशेरी, हडपसर-मुंढवा, वानवडी-रामटेकडी आणि येरवडा-कळस-धानोरी या विभागांतील चौकाचौकांत ही अतिक्रमणं खुलेआम उभारण्यात आली होती.
विशेष म्हणजे, प्रत्येक जाहिरात फलकासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आवश्यक असून, त्यासाठी निश्चित शुल्क भरावे लागते. मात्र बरेच जाहिरातदार ही प्रक्रिया टाळून फलक लावत असून, त्यामुळे महापालिकेच्या महसुलात मोठी गळती होत आहे. अवैध फलकांमुळे महापालिकेला लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वतः या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कारवाईला गती देण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय उपायुक्त संतोष वारूळे यांनी स्पष्ट केले की, अनधिकृत फलकांविरोधातील कारवाई ही एकदाच नव्हे, तर सातत्याने सुरूच राहणार आहे.
मात्र, प्रश्न उपस्थित होतो तो महापालिकेच्या व्यवस्थापन क्षमतेवर. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फलक उभे राहतात, आणि प्रशासनाला ते लक्षात येण्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागते, हीच गोष्ट धक्कादायक आहे. हे स्पष्ट सूचित करते की, परवानगी नसतानाही जाहिरात फलक उभारणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे नियंत्रण शिथिल झाले आहे.
गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनाही प्रशासनाच्या लक्षात असतानाही, कारवाई केवळ घटनांनंतरच का केली जाते, असा सवाल निर्माण होतो.
आज महापालिकेने २४ फलक पाडलेत, उद्या आणखी उभारले जातील. ही साखळी तुटण्यासाठी मूळ प्रश्नांवर उपाययोजना करणे आवश्यक आहे — त्यात नियमांचे काटेकोर पालन, परवानगी प्रक्रिया पारदर्शक ठेवणे, आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
शहराची शिस्त आणि नागरिकांची सुरक्षितता टिकवायची असेल, तर अनधिकृत जाहिरात फलकांचा विळखा तातडीने फोडणे हेच एकमेव उत्तर आहे!