Pune Water Supply Cut: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
Pune Water Supply Update: पुणे शहरातील रहिवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. पुणेकरांनी आता पाणी जपून वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ससून रुग्णालयाच्या परिसरात पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी एक महत्त्वाची जलवाहिनी फुटली आहे.
या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे आणि यामुळे आजूबाजूच्या भागातील पाणी पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. शहरातील काही भागांमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा खंडित राहील. यासंदर्भात अधिक तपशील समजून घेऊया.
मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयाच्या परिसरातील फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशन आणि आसपासच्या परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 17 ऑगस्ट रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे पुणेकरांनी पुढील काही दिवस पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.
खास करून, या भागातील पाणीपुरवठा खंडित राहील:
ससून रुग्णालय परिसरातील जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे शुक्रवारी पुणे रेल्वे स्थानक, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गारपीर वस्ती, पांढरा गणपती परिसर, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, सारस्वत कॉलनी, घोडमळा परिसर, जेधे पार्क, संचेती रुग्णालय ते मोदीबागपर्यंतचा गणेशखिंड रस्ता, जुना पुणे-मुंबई रस्ता, संगम पूल ते मुळा रस्तापर्यंतचा परिसर, ताडीवाला रस्ता झोपडपट्टी, आणि जुना बाजार या भागात पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करावा आणि पाणी जपून वापरावे, असा इशारा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
जुनी जलवाहिन्या बदलण्याची आवश्यकता:
पुणे शहरातील अनेक जलवाहिन्या आता जुन्या झाल्या आहेत, त्यामुळे त्यात फुट पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, काही जलवाहिन्या लीक झालेल्या आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. या समस्यांमुळे काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागरिकांनी या समस्येकडे लक्ष देण्याची आणि आवश्यक बदल करण्याची मागणी केली आहे.