पुणे: उत्पन्न दाखल्यांच्या दिरंगाईविरोधात पुण्यात जागरण गोंधळ आंदोलन – पहा व्हिडिओ

पुणे, २९ मे २०२५: पुणे शहर आणि हवेली तहसील कार्यालयाकडून उत्पन्नाचे दाखले देण्यास होणारी दिरंगाई आणि गैरसोयींविरोधात रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने आज शिवाजी रस्त्यावरील मामलेदार कचेरीसमोर तीव्र जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. गरीब रुग्णांना उपचार आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या या दाखल्यांच्या विलंबामुळे अनेकांचे हाल होत असल्याचा आरोप परिषदेने केला.
पहा व्हिडिओ
रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संयोजक शहराध्यक्ष अपर्णा मारणे-साठ्ये, कविता डाडर, प्रभा अवलेलू, सोनाली ओव्हाळ, रेखा वाघमारे, चित्रा साळवे, सुरेश फाले, रेश्मा जांभळे, अशोक भोसले, राजेश अडसूळ, डॉ. योगेश कदम, डॉ. सुनील साळवे, आशिष गांधी, सलीम शेख, मंदाताई साठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
उमेश चव्हाण यांनी सांगितले, “गेल्या एक महिन्यांपासून उत्पन्नाचे दाखले देण्यास तहसील कार्यालय जाणीवपूर्वक विलंब करत आहे. यामुळे रुग्णांना मोफत आरोग्य योजनांचा लाभ घेता येत नाही, तर विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेलाही खीळ बसत आहे. खाजगी ई-सेवा केंद्रांवर मनमानी शुल्क आकारले जाते, तरीही दाखले मिळण्यास २०-२५ दिवस लागतात. यामुळे अनेकांना कर्ज काढावे लागत आहे, तर काहींची घरे उद्ध्वस्त होत आहेत.”
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निद्रिस्त अवस्थेतून जागे करण्यासाठी धार्मिक स्वरूपाचा जागरण गोंधळ घालत आपला निषेध नोंदवला. त्वरित उत्पन्नाचे दाखले देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रुग्ण हक्क परिषदेने दिला आहे.