पुणे: चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांचा हल्ला, पोलिसांचा तपास सुरू – व्हिडिओ
पुणे: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणारे ज्येष्ठ नेते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात टिंगरे आणि त्यांचा कार चालक सचिन गायकवाड जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दगडफेक आणि तोडफोड
मंगळवारी दुपारी चंद्रकांत टिंगरे आणि सचिन गायकवाड हे एमएसईबी कार्यालयाकडे जात असताना हा हल्ला झाला. कार पार्क करून खाली उतरत असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी पाठिमागून कारवर दगड मारले. गोंधळ उडाल्याने कार चालक सचिन गायकवाड बाहेर पडले, त्याचवेळी समोरून सिमेंटचा गट्टू कारच्या काचांवर मारून तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात टिंगरे यांना दुखापत झाली आहे.
पहा व्हिडिओ
वडगाव शेरीत खळबळ
या घटनेने वडगाव शेरी परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थितीचा आढावा घेत तपास सुरू केला आहे. या घटनेवर महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
पठारे यांचा संताप
“मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना अशा प्रकारचा हल्ला होणे ही लकशाहीच्या मुल्यांवर आघात आहे. विचारांची लढाई हिंसेने नाही, तर विचारांनीच लढली पाहिजे,” असे बापूसाहेब पठारे म्हणाले. त्यांनी पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली असून हल्लेखोरांना धडा शिकवला जाईल, असेही ते म्हणाले.
राजकीय पार्श्वभूमी
रेखा टिंगरे या भाजपच्या माजी नगरसेविका असून काही महिन्यांपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला होता. मात्र, सहा दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेतली आणि वडगाव शेरीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार सुरू केला होता.
या हल्ल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले आहे. वडगाव शेरीतील निवडणूक वातावरण त्यामुळे अधिकच तापले आहे.