पुणे: वारजे-कर्वेनगर परिसरात अनधिकृत फलकांचा सुळसुळाट; नागरिक त्रस्त

0
IMG_20250825_021255.jpg

वारजे, ता. २५ : वारजे, कर्वेनगर, शिवणे, कोंढवे-कोपरे आणि कोंढवे-धावडे परिसरात अनधिकृत फलकबाजीचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्याच्या कडेने, पुलांवर, वाहतूक सिग्नलवर, विद्युत खांबांवर आणि व्यावसायिक आस्थापनांवर उभारण्यात आलेले हे फलक धोकादायक ठरत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

राजकीय व्यक्तींचे वाढदिवस, सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम याच्या नावाखाली फलक उभारले जात असून, दोरी, तार, खिळे ठोकून लावलेल्या या जाहिराती कधीही कोसळून अपघात घडवू शकतात. सिग्नलजवळील फलकांमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे. विद्युत खांबांवरील फलकांमुळे शॉर्टसर्किट आणि आगीचा धोका निर्माण झाल्याची उदाहरणेही समोर आली आहेत.

“वारजे-कर्वेनगर भागाला या अनधिकृत फलकांमुळे बकालपणा आला आहे. प्रत्येक वळणावर आणि खांबावर फक्त फलकच दिसतात. प्रशासनाने धडक कारवाई करून हे फलक हटवावेत,” अशी मागणी विधितज्ज्ञ सलीम शेख (शिवणे) यांनी केली.

तर स्थानिक नागरिक गणेश गावंडे (वारजे) यांनी सांगितले की, “या फलकांमुळे विद्युत खांबावर स्पार्क झाल्याचे आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठोस भूमिका घेऊन फलकांच्या मालकांवर कारवाई करावी.”

याबाबत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त दीपक राऊत यांनी सांगितले की, “अनधिकृत फलकांवर नियमित कारवाई सुरू आहे. अनेकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यापुढे फौजदारी कारवाई करत फलक हटविले जातील.”

नागरिकांनी तातडीने अनधिकृत फलक हटविण्याची मोहीम राबवावी व दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.


Spread the love

Leave a Reply