पुणे: श्री गणेश जयंतीनिमित्त वाहतूक बदल; पुणेकरांना पर्यायी मार्गांचा सल्ला
पुणे: श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. भाविकांना सुरळीत दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पूर्णतः वाहतुकीस बंद केला आहे.
शिवाजीनगर – स्वारगेट मार्गावरील वाहतूक वळवली
या निर्णयाचा परिणाम शिवाजीनगर ते स्वारगेटदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांवर होणार असून, त्यांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस व इतर वाहनांनी
स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक) → झाशीची राणी चौक → जंगली महाराज रस्ता → खंडोबीजाबाबा चौक → टिळक चौक मार्गे पुढे जावे.
स. गो. बर्वे चौकाहून महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनांनी
झाशीची राणी चौक मार्गे महापालिका भवनकडे जावे.
अप्पा बळवंत चौक – बुधवार चौक रस्ता बंद
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहने अप्पा बळवंत चौक मार्गे पुढे जावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लक्ष्मी रस्त्यावरही बदल होण्याची शक्यता
भाविकांची गर्दी जास्त झाल्यास लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकातून वाहने पर्यायी मार्गाने वळवली जातील, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.
पोलीस प्रशासनाचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी पुणेकरांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी वाहतूक बदल करण्यात आले असले तरी, नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार प्रवास करावा आणि गर्दीच्या ठिकाणी शिस्त पाळावी, असे त्यांनी सांगितले.
—
संपादक : श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक पुण्यात दाखल होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेल्या या बदलांमुळे वाहतूक सुरळीत राहील, असा प्रशासनाचा विश्वास आहे.