पुणे: येरवडा विसर्जन घाटावर अजूनही अव्यवस्था; आवश्यक सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष – व्हिडिओ

पुणे – येरवडा गणपती विसर्जन घाटावर गणपती विसर्जनाच्या काळात दरवर्षी लाखो भाविक येऊनही, घाटावरील मूलभूत सुविधा अद्यापही अपुऱ्या असल्याची तक्रार भारतीय जनता पार्टी–महाराष्ट्र अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनवर पठाण यांनी केली आहे.
पहा व्हिडिओ
सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पठाण यांनी स्पष्ट केले की, घाटावर विद्युत रोषणाई, लाईट व दिव्यांची दुरुस्ती, रंगरंगोटीचे काम, स्वच्छतागृहातील स्वच्छता, पाणीपुरवठा, नाईट लाइटची सोय, हौदाची देखभाल आणि हारफुलांसाठी कंटेनर अथवा निर्माल्य कलशाची व्यवस्था वेळेत होत नाही. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी भाविकांना अस्वच्छता, अंधार व पाण्याअभावी त्रास सहन करावा लागतो.
“सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर मंडळे व भाविक विसर्जनासाठी येणार आहेत. मात्र प्रशासनाने वेळेत नियोजन केले नाही, तर गर्दीच्या वेळी गैरसोय, अपघात आणि गोंधळ टाळता येणार नाही,” असा इशारा पठाण यांनी दिला आहे.
भाविकांचा प्रश्न आहे की, दरवर्षी लाखो रुपये खर्च करूनही घाटाची रंगरंगोटी, लाईट व्यवस्था आणि स्वच्छता विसर्जनाच्या आधीच का पूर्ण होत नाही? प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.