पूणे: खडकी-येरवडा मार्गावरून पिंपरी-चिंचवडला थेट बस नाही; प्रवाशांचे हाल सुरूच

पुणे, प्रतिनिधी:
पुणे स्टेशन आणि पिंपरी-चिंचवड दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना सध्या पीएमपीएमएलच्या (PMPML) असमर्थ व्यवस्थेमुळे प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पुणे स्टेशनहून पिंपरी-चिंचवडकडे परतताना खडकी-येरवडा या महत्त्वाच्या मार्गावरून थेट बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे.
पिंपरी-चिंचवड भागातून पुणे स्टेशनकडे येणाऱ्या बसगाड्या खडकी आणि येरवडा मार्गे धावत असल्या तरी, याच मार्गावरून परतीच्या दिशेने एकही नियमित बससेवा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या बसगाड्यांवर खडकी-येरवडा मार्गाचा उल्लेखही टाळला जातो, ही बाब प्रवाशांच्या संभ्रमात भर घालणारी ठरते.
या थेट बससेवेच्या अभावामुळे खडकी, येरवडा आणि पिंपरी-चिंचवडमधील नोकरदार, विद्यार्थी आणि महिला प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. रिक्षा हीच पर्याय म्हणून उरते, परंतु ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसते. सायंकाळी उशिरापर्यंत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि वेळेत घर पोहोचणे मोठे आव्हान ठरत आहे, अशी माहिती प्रवासी गंगाधर परदेशी यांनी दिली.
याशिवाय, या मार्गावरील बसथांबेही अस्वच्छ आणि दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. नियमित स्वच्छता आणि देखभालीअभावी प्रवाशांना दुर्गंधी आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागत असून, उन्हाळ्यात ही स्थिती अधिकच त्रासदायक ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रवाशांची जोरदार मागणी आहे की, पीएमपीएमएलने पुणे स्टेशनहून येरवडा-खडकी मार्गे पिंपरी-चिंचवडला जाणाऱ्या थेट आणि नियमित बससेवा तातडीने सुरू करावी. तसेच, बसच्या फेऱ्या वाढवाव्यात, मार्गावरील थांब्यांची योग्य देखभाल करावी आणि बसवरील मार्गदर्शक फलक अधिक स्पष्ट आणि माहितीपूर्ण असावेत.
हजारो प्रवाशांची ही रास्त मागणी पीएमपीएमएल प्रशासन गांभीर्याने घेईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.