पुणे: कोंढव्यातील कत्तलखान्याचा तिढा सुटला; दोन लाखांची बँक हमी भरून पुन्हा सुरू

पुणे : कोंढव्यातील महापालिकेचा कत्तलखाना अखेर पुन्हा सुरू झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) ८ मे रोजी प्रदूषण नियमांचे उल्लंघन झाल्याने हा कत्तलखाना बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र आवश्यक सुधारणा व अटींची पूर्तता करून अखेर १३ ऑगस्ट रोजी मंडळाकडून सशर्त परवानगी मिळाली.
या परवानगीनुसार महापालिकेला दोन लाख रुपयांची बँक हमी भरावी लागली असून, टप्प्याटप्प्याने कत्तलखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. सध्या दररोज १० मोठ्या जनावरांची कत्तल केली जात असून, डिसेंबरपर्यंत ही क्षमता ७० पर्यंत नेण्याचे नियोजन आहे, अशी माहिती डॉ. सारिका फुंडे, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली.
मंडळाचे अटी व उपाययोजना :
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात सुधारणा
नवीन फ्लो मीटर बसविणे
सर्व टाक्यांची स्वच्छता
पंपांची दुरुस्ती व देखभाल
एअर ब्लोअरची दुरुस्ती
प्रकल्प परिसराची स्वच्छता
निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट
कोंढव्यातील हा महापालिकेचा एकमेव कत्तलखाना असून, प्रामुख्याने म्हैसवर्गीय प्राण्यांची कत्तल येथे केली जाते. स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रदूषणाच्या तक्रारी केल्यानंतरच मंडळाने तपासणी करून नियमभंगाची नोंद केली होती. अखेर सुधारणा करून कत्तलखाना पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
—