पुणे: ससूनमध्ये ‘चहापाणी’चा दर ठरलेला? मृतदेहासाठीही ८०० रुपयांची उघड लाचखोरी – व्हिडिओ व्हायरल
पुणे: राज्यातील नामांकित आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ससून सर्वोपचार रुग्णालयात माणुसकीचा मृत्यू झाला की काय, असा सवाल उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचा देह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यासाठीही इथे “चहापाणी” मागितले जाते आणि तेही उघडपणे—अगदी ८०० रुपये ‘उकळून’!
पहा व्हिडिओ
रुग्णालयात दुःखाच्या छायेत असलेले कुटुंबीय, डोळ्यांत अश्रू आणि मनात वेदना घेऊन मृतदेह घेण्यासाठी येतात. मात्र, या वेदनांवर मीठ चोळण्याचे काम काही कर्मचारी करत असल्याचे वास्तव उघड झाले आहे. मृतदेह देण्याची शासकीय प्रक्रिया मोफत असताना, प्रत्यक्षात मात्र लाच दिल्याशिवाय काम पुढे सरकत नाही, ही ससूनमधील ‘अलिखित परंपरा’ असल्याचे बोलले जात आहे.
“सरकारी रुग्णालय आहे, नियम आहेत, पण नियमांपेक्षा इथे दरपत्रकच जास्त चालते,” अशी संतप्त प्रतिक्रिया नातेवाइकांतून उमटत आहे. चहापाणी म्हणत मागितले जाणारे हे पैसे नेमके कोणासाठी? आणि कोणाच्या आशीर्वादाने हा धंदा सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
ससूनसारख्या रुग्णालयात जर मृतदेहासाठीही लाच द्यावी लागत असेल, तर सर्वसामान्य रुग्णांच्या हक्कांचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. प्रशासनाकडून नेहमीच ‘शून्य सहनशीलता’ची भाषा केली जाते, पण प्रत्यक्षात मात्र लाचखोरीला मूक संमती दिली जात असल्याचे चित्र दिसते.
आता प्रश्न इतकाच आहे—
ही घटना अपवाद आहे की ससूनमधील रोजची प्रथा?
आणि यावर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे चौकशीच्या फाईल्समध्येच हा प्रकार ‘मृत’ होणार?
—