पुणे: निवडणूक आली, पोलिसांना जाग आली!
१६ जण तडीपार, ९ थेट जेलमध्ये — गुंडांना ‘नववर्षाची भेट’
पुणे, दि. २ (प्रतिनिधी)
पुण्यात कायदा-सुव्यवस्था वर्षभर ‘एडजस्ट’ मोडवर असते; मात्र निवडणुकीची चाहूल लागताच पोलिस यंत्रणा अचानक ‘अॅक्टिव्ह’ झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एकाच दिवसात १६ जणांवर तडीपारीची कारवाई करत, तर ९ सराईत गुन्हेगारांना थेट येरवडा कारागृहात पाठवत ‘आम्ही जागे आहोत’ असा ठोस संदेश दिला आहे.
परिमंडळ-७मध्ये एकाच दिवसात १६ जण तडीपार होणे ही कारवाई कमी आणि निवडणूकपूर्व ‘डेमो’ जास्त असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. चंदननगर, वाघोली, लोहगाव, विमाननगर, खराडी या भागांतील गुन्हेगारांना अचानक पुण्याबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. विशेष म्हणजे, हेच चेहरे वर्षानुवर्षे परिसरात खुलेआम वावरत असताना, निवडणूक जाहीर होताच त्यांची अचानक आठवण होणे हा योगायोग म्हणायचा की नियोजन, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
दुसरीकडे, परिमंडळ-१मध्ये खडक, डेक्कन आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ९ गुन्हेगारांना १४ दिवसांसाठी येरवडा कारागृहात डांबण्यात आले. वर्षभर ‘रेकॉर्डवर’ असलेले गुन्हे निवडणुकीच्या तोंडावरच गंभीर वाटू लागल्याने, “निवडणूक संपली की हे पुन्हा बाहेर येणार का?” असा उपरोधिक सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशाने ही मोहीम राबवण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी “निवडणूक नसती तर ही कारवाई झाली असती का?” हा प्रश्न हवेतच लटकलेला आहे. पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे फोटो, प्रेसनोट आणि आकडे मात्र चोख प्रसिद्ध करण्यात आले.
एकूणच, पुण्यात कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी तडीपारी आणि कारागृहाचा वापर निवडणूक काळापुरताच मर्यादित राहतो की कायमस्वरूपी धोरण बनेल, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत, “निवडणूक आली, गुंड गेले; निवडणूक गेली, गुंड परत येणार?” अशी कुजबुज पुण्याच्या गल्लीबोळात ऐकू येत आहे.
—