पुणे: चाकणमधील कोंडी सुटणार! उन्नत मार्ग व बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग

0
traffic-jams-.jpg

पुणे : चाकण परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नाशिक फाटा–राजगुरूनगर उन्नत मार्गासह पर्यायी बाह्यवळण मार्ग उभारणीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत. गुरुवारी झालेल्या संयुक्त बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मोजणी करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या.

चाकण व हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीसह नागरी समस्या सोडविण्यासाठी रस्ते रुंदीकरण, वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड) आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसाठी जमिनी संपादनाची प्रक्रिया सुरू असल्याचे डॉ. म्हसे यांनी स्पष्ट केले. त्यांनी म्हटले, “पुणे परिसरातील वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या आहे. तिच्या निराकरणासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत.”

बैठकीत नाशिक फाटा–राजगुरूनगर उन्नत मार्गासाठी नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी आणि चाकण या गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचे ठरले. तसेच, चाकण शहरातील कोंडी कमी करण्यासाठी मेदनकरवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी या गावांमधून पर्यायी बाह्यवळण मार्ग उभारण्यासाठी जमिनी संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय मुळशी तालुक्यातील बालेवाडी–शेडगेवस्ती, सूर्या हॉस्पिटल–ठाकर वस्ती आणि नांदे–माण या मार्गांवरील भूसंपादन प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. नवले पुलाजवळील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विविध पर्यायांची चर्चा यावेळी झाली.

बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी व नियोजन संचालक अविनाश पाटील, मुख्य अभियंता रिनाज पठाण, भूसंपादन समन्वय अधिकारी कल्याण पांढरे, सहआयुक्त हिम्मत खराडे, अधीक्षक आशा जाधव यांच्यासह पीएमआरडीए, पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष
चाकण औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील वाढत्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनाने आता भूसंपादन प्रक्रियेला गती दिल्याने चाकणमधील कोंडी दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Spread the love

Leave a Reply