पुणे: अवैध धंद्यांवर कडक कार्यवाही करा, खासदार अमोल कोल्हेंचे पोलीस आयुक्तांना पत्र; अवैध धंद्यांवर वेळीच कारवाई न झाल्यास गंभीर परिणाम

IMG_20250114_102435.jpg

पुणे: लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे नागरिक त्रस्त असून या धंद्यांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

अवैध धंद्यांची गंभीर समस्या
गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाण्याच्या टाकीजवळ सर्रासपणे गावठी दारू विक्री होत आहे. याशिवाय, या परिसरात बेकायदा हुक्का पार्लर, मटका क्लब आणि इतर अवैध धंद्यांचा मोठा भरणा आहे. पानटपऱ्यांवर तंबाखू, जर्दा, गुटखा आणि नशेचे पदार्थ विक्रीचे प्रकार वाढले आहेत, ज्यामुळे स्थानिक तरुण नशेच्या आहारी जात आहेत.

पोलीस यंत्रणेकडे दुर्लक्षाचा आरोप
या घटनांमुळे गावातील वातावरण दूषित झाले असून नागरिकांनी पोलीस यंत्रणेकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार केली आहे. तरुणाई गुन्हेगारीकडे वळत असल्याने गावातील पालकवर्ग देखील चिंतेत आहे.

कडक कारवाईची मागणी
“अवैध धंद्यांवर वेळीच कठोर कारवाई न झाल्यास भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते,” असे नमूद करत खासदार कोल्हे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांना केले आहे. तसेच, लोणी काळभोरमधील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देऊन त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गावातील सामान्य नागरिकांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Spread the love

You may have missed