पुणे: निलंबित कृषी सेवकाचा कोयत्याने धुडगूस;
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात घुसखोरी; संगणक फोडला, कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी

0
507f68a9-ef02-4f37-acd4-f4754fc0d34c_1766667114666.webp

पुणे : एरंडवणे येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी एका निलंबित कृषी सेवकाने थेट कोयता घेऊन घुसखोरी करत प्रचंड गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. सचिन कांबळे असे आरोपीचे नाव असून, त्याने कार्यालयातील संगणकाची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे कार्यालयातील कर्मचारी भयभीत झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन कांबळे हातात धारदार कोयता घेऊन बळजबरीने कार्यालयात शिरला. त्याने थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश केला. त्या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौऱ्यावर असल्याने सहायक अधिकारी योगेश गडपायले यांनी त्याला माहिती दिली. मात्र, यामुळे कांबळे अधिकच संतप्त झाला.

संतापाच्या भरात त्याने शिवीगाळ करत कक्षातील टेबलावर ठेवलेला संगणक फोडला आणि कार्यालयातील साहित्याची तोडफोड सुरू केली. कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रमेश लक्ष्मण सकपाल (वय ५७) व इतर कर्मचारी त्याला शांत करण्यासाठी पुढे गेले असता, आरोपीने कोयता उगारत सर्वांना धमकावले.
“या कार्यालयात कोणीही काम करू नये; जो काम करेल त्याला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत त्याने परिसरात दहशत निर्माण केली.

घटनेमुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ ११२ व १०० क्रमांकावर संपर्क साधत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच अलंकार पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी सचिन कांबळे याला ताब्यात घेतले व त्याच्याकडील कोयता जप्त केला. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.

या प्रकरणी वरिष्ठ लिपिक रमेश सकपाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सचिन कांबळे याची २६ मार्च २०१३ रोजी राजगुरुनगर येथील चिकित्सालय जिल्हा मध्यवर्ती फल रोपवाटिकेत कृषी सेवक म्हणून नियुक्ती झाली होती. नियुक्तीनंतर सहा महिन्यांत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने त्याची सेवा थांबवण्यात आली होती. नंतर प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्याला पुन्हा नोकरी व पदोन्नती देण्यात आली.

मात्र, जून २०१६ पासून तो कामावर गैरहजर राहिल्याने त्याचे वेतन व भत्ते बंद करण्यात आले होते. १७ जुलै २०१४ रोजी त्याला निलंबित करण्यात आले होते. वेतन न मिळाल्याच्या रागातूनच आरोपीने हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

अलंकार पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम २५ व ४, सार्वजनिक संपत्ती नुकसान निवारण अधिनियम १९८४ च्या कलम ३(१) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५२, ३५१(३), ३२४(३) आणि १३२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप येसणे करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

You may have missed