पुणे: मुस्लिम धर्मस्थळांवरील एकतर्फी कारवाई थांबवा; अन्यथा आंदोलन उभारू – गफूर पठाण यांचा इशारा

n66626280717484981330251ac4e335bebc04f15542f5195e859e68588eaac1b116f1666f90bc7ea4c1e80d.jpg

पुणे – शहरातील मुस्लिम धर्मस्थळांवर पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून एकतर्फी कारवाई केली जात असून, केवळ हिंदुत्ववादी दबावाखाली ही पावले उचलली जात असल्याचा आरोप करत ही कारवाई त्वरित थांबवावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक गफूर पठाण यांनी दिला.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना आज नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी या संघटनेच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात निवेदन दिले. या वेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे, माजी नगरसेवक अॅड. आयुब शेख, रफिक शेख, गफूर पठाण, काँग्रेस नेते महबूब शेख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले की, शहरातील मशिद, मदरसे आणि दर्ग्यांवर महापालिकेच्या वतीने सुरू असलेली कारवाई ही पूर्णतः धर्मनिरपेक्ष भूमिकेशी विसंगत असून, ती फक्त मुस्लिम समाजाच्या धर्मस्थळांपुरतीच मर्यादित आहे. शहरात सुमारे दहा हजारांहून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे असतानाही कारवाई एकाच धर्मावर केंद्रित असणे ही कायद्यातील असमानता असल्याचे शिष्टमंडळाचे म्हणणे आहे.

धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप

“धार्मिक स्थळांवरील कारवाई ही सर्वोच्च न्यायालय व राज्य शासनाच्या निर्देशानुसार धर्मनिरपेक्षपणे व्हायला हवी. कोणत्याही एका धर्माला लक्ष्य करणे हे धार्मिक अत्याचारासारखे आहे,” असे मत राहुल डंबाळे यांनी व्यक्त केले.

तसेच, आयुब शेख यांनी सांगितले की, “जे धार्मिक स्थळ नियमांच्या चौकटीत बसतात, त्यांना नियमित करण्यात यावे. मात्र कोणत्याही धर्माच्या स्थळावर निवडकपणे कारवाई करणे योग्य नाही.”

“देशात सध्या धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू आहे. मंदिर-मशीद वाद उकरून धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे,” असा आरोप रफिक शेख यांनी केला.

न्यायालयीन लढाईची तयारी

या एकतर्फी कारवाईच्या विरोधात न्यायालयीन लढाही लढण्यात येईल, अशी माहिती महबूब नदाफ यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील असंतोष वाढत असून, प्रशासनाने त्वरित धार्मिक समभावाचे धोरण अंगीकारावे, अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीकडून करण्यात आली आहे.

Spread the love

You may have missed