पुणे : “रन फॉर युनिटी” मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद;
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विश्रांतवाडी पोलिसांचा उपक्रम
पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने “लोहपुरुष” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “रन फॉर युनिटी मॅरेथॉन दौड”चे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनला शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या स्पर्धेला विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथून सुरुवात झालेली ही मॅरेथॉन पामगार्डन, आळंदी रोड, दत्त मंदिर, साप्रस पोलीस चौकी, डॉ. आंबेडकर सोसायटी बीआरटी बस स्टॉप, चंद्रमा चौक मार्गे परत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे समारोप करण्यात आला.
या उपक्रमासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ४ चे उपायुक्त सोमय मुंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांनी मार्गदर्शन केले.
या युनिटी मॅरेथॉनमध्ये इमॅन्युअल मार्थोमा स्कूल टिंगरेनगर, लोकमान्य टिळक स्कूल खडकी, न्यूरॉन लॅब स्कूल धानोरी, सेंट पीटर स्कूल धानोरी, डॉ. मारतो फिलिस स्कूल धानोरी या पाच शाळांबरोबरच आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले. एकूण सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थी, नागरिक व पोलिस कर्मचारी यांनी एकत्रित सहभाग नोंदविला.
मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर नृत्य करत उत्सवाचे रूप दिले. सहभागींसाठी पिण्याचे पाणी, चहापान आणि अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट, साप्रस मिनी मॅरेथॉनचे स्वयंसेवक, केदारनाथ हॉस्पिटलचे डॉक्टर व स्टाफ, रुग्णवाहिका सेवा तसेच आदर पूनावाला क्लीन सिटी संस्थेचे सफाई कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
या मॅरेथॉनद्वारे एकतेचा संदेश देत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा जागर जागी प्रसार करण्यात आला.