पुणे: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बस नियमावलीत सुधारणा; अनधिकृत बसेसवर कठोर कारवाईचा इशारा

0
IMG_20250509_143052.jpg

पुणे, ९ मे: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य देत परिवहन विभागाने स्कूल बस वाहतूक नियमावलीत आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन यांच्याशी बैठक पार पडली.

या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही. नियम केवळ कायद्याच्या भीतीने नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या भावनेतून पाळले जावेत, असेही त्यांनी सांगितले.

सध्या राज्यात सुमारे ४० हजार अधिकृत स्कूल बसेस कार्यरत असताना, ५० ते ६० हजार अनधिकृत बसेस विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, पुढील तीन महिन्यांत अनधिकृत स्कूल बस चालक-मालकांनी आवश्यक दंड भरून आपली वाहने अधिकृत करावीत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच अशा वाहनांना आश्रय देणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल.

परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले की, स्कूल बस धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. विद्यमान धोरणातील त्रुटी दूर करताना पालक व असोसिएशनच्या सूचनांचा विचार करण्यात येईल.

ही बैठक स्कूल बस वाहतूक व्यवस्थेतील पारदर्शकता व सुरक्षिततेच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया उपस्थित संघटनांनी दिली.

Spread the love

Leave a Reply

You may have missed