पुणे: सह्याद्री रुग्णालयावर निष्काळजीपणाचा संशय; पती-पत्नीच्या मृत्यूची आरोग्य विभागाकडून चौकशी

पुणे – यकृत प्रत्यारोपणानंतर अवघ्या आठवड्याच्या आतच पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची दखल घेत आरोग्य विभागाने डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयाला खुलासा करण्याची नोटीस बजावली असून वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपांचीही चौकशी होणार आहे.
पुणे परिमंडळाचे प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस रुग्णालयाला धाडण्यात आली आहे. “शस्त्रक्रियेदरम्यान किंवा उपचारांबाबत नेमके काय घडले, याबाबत चौकशी केली जाणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हडपसरमधील बापू बाळकृष्ण कोमकर (४८) यांना यकृत निकामी झाल्याने प्रत्यारोपणाची गरज होती. पत्नी कामिनी (४२) यांनी स्वेच्छेने यकृतदानास संमती दिली. मात्र १५ ऑगस्ट रोजी शस्त्रक्रियेनंतर बापू यांचा मृत्यू झाला, तर २२ ऑगस्ट रोजी उपचार सुरू असतानाच कामिनी यांचेही निधन झाले. ससून रुग्णालयात शवविच्छेदन झाले असून अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
अवघ्या आठवड्यात दोन्ही पालकांचे निधन झाल्याने कोमकर दाम्पत्याचा २१ वर्षीय मुलगा आणि १४ वर्षांची मुलगी पोरकी झाली आहेत. या प्रत्यारोपणासाठी तब्बल २० लाख रुपये खर्च आला होता. यासाठी कोमकर दाम्पत्याने आपली सदनिका गहाण ठेवली होती. बापू हे घरातील एकमेव कमावते होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
नातेवाईकांनी रुग्णालयावर शस्त्रक्रियेत व उपचारात निष्काळजीपणाचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “कामिनी यांना मानसिक धक्का लागू नये म्हणून पतीच्या मृत्यूची माहिती त्यांना सांगितली नव्हती,” असे त्यांच्या भावाने बलराज वाडेकर यांनी सांगितले.
रुग्णालय प्रशासनाने संवेदना व्यक्त करत चौकशीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. “आम्हाला उपसंचालकांकडून नोटीस मिळाली आहे. सखोल व पारदर्शक तपास व्हावा, यासाठी आम्ही सर्व माहिती उपलब्ध करून देऊ,” असे सह्याद्री रुग्णालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, प्रत्यारोपणासाठी मंजुरी देण्याचे काम रुग्णालयाच्या अंतर्गत समितीमार्फतच झाले होते. आता रुग्ण आणि दाता यांचा नातेसंबंध, अवयवाची जुळवाजुळव तसेच शस्त्रक्रियेनंतरची वैद्यकीय प्रक्रिया याबाबत आरोग्य विभाग सखोल चौकशी करणार आहे.